कालवे सल्लागार समिती बैठक संपन्न: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती; म्हणाले- पुणे शहरात सध्या पाणीकपात नाही

  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Canal Advisory Committee Meeting Concluded | Guardian Minister Chandrakant Patil Said There Is No Water Shortage In Pune City At Present 

पुणे7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सध्या खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असल्याने पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही तसेच सुरू असलेले सिंचनाचे आवर्तनही नियोजनाप्रमाणे सुरू राहील. पावसाचा परिस्थिती पाहून ऑक्टोबरमध्ये पुन्हा आढावा घेऊन नियोजन करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत स्पष्ट केले.

खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समिती बैठकीस राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार राहूल कुल, अशोक पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. तथापि, सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पातील धरणाची स्थिती चांगली आहे. पुढील महिन्याभरात पावसाचे प्रमाण कसे राहते त्यावर लक्ष ठेऊन ऑक्टोबरमध्ये पुढील नियोजन ठरविण्यात येईल. पवना व चासकमान मध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला असून भामा आसखेडमध्येही समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या प्रकल्पांच्या पाणी नियोजनाबाबत कोणतीही अडचण नाही असे जलसंपदा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

नीरा प्रणालीत समाधानकारक पाणी

नीरा प्रणालीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ४ टीएमसी ने पाणीसाठा कमी असून उपयुक्त पाणीसाठा ९१ टक्के आहे. सध्यातरी समाधानकारक पाणीसाठा आहे. तथापि, लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाणी समन्यायी पद्धतीने सर्वांना मिळेल यासाठी नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

कालव्याच्या टेलच्या भागातील शेतीला योग्य दाबाने पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करा, त्यासाठी कालवेक्षेत्रातील पाणी उपशावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यकता भासल्यास ठराविक वेळेतच वीजपुरवठा करा. अवैध पाणीवापरावर नियंत्रण आणण्यासाठी मनुष्यबळाचे फेरनियोजन करत इतर ठिकाणचे मनुष्यबळ सिंचन व्यवस्थापनावर वापरात आणावे. बाह्य स्रोताद्वारे तात्पुरते मनुष्यबळ घेण्यात यावे, अशा सूचना महसूलमंत्री विखे पाटील यांनी केल्या. नीरा डाव्या कालव्याद्वारे संरक्षित सिंचन पूर्ण होताच शेटफळ तलाव 50 टक्के भरण्याचे नियोजन आहे. सध्या नीरा उजवा कालवा आणि डावा कालव्याचे आवर्तन सुरू असून ते नियोजनाप्रमाणे सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *