धुळे : हेंद्रुण-मोघण शिवारात धुडगूस घालणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद | महातंत्र

धुळे; महातंत्र वृत्तसेवा : हेंद्रुण-मोघण (ता.धुळे) शिवारात धुडगूस घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला पकडण्यात अखेर यश आले आहे. रेक्स्यू पथक आणि वनविभागाच्या अथक प्रयत्नानंतर आज सोमवारी (दि.३०) हेंद्रुण शिवारातून त्याला जेरबंद करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटेकचा निश्‍वास सोडला असून आ.कुणाल पाटील यांनी रेस्कू पथक आणि वनविभागाचे कौतुक केले आहे.

गेल्या आठवड्यापासून धुळे तालुक्यातील बोरकुंड, होरपाडा, नंदाळे, हेंद्रुण, मोघण परिसरत नरभक्षक बिबट्या धुडगूस घातला होता. या बिबट्याच्या हल्ल्यात तीन बालकांचा बळी गेला आहे. त्यामुळे बोरी परिसरात भीतीचे वातावरण होते. या बिबट्याचा बंदोबस्त व्हावा, यासाठी आ.कुणाल पाटील यांनी २६ ऑक्टोबरला राज्याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांची मुंबई तातडीने भेट घेतली. आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने पाऊले उचलावीत, अशी मागणी केली होती. तसेच हल्ल्यात बळी गेलेल्या बालकांच्या कुंटुंबियांना तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी पाटील यांनी यावेळी केली होती. आ.कुणाल पाटील यांच्या मागणीनंतर अखेर वनविभाग खडबडून जागे झाले.

रेस्क्यू पथकाला पाचारण

वनमंत्र्यांना भेटल्यानंतर आ.कुणाल पाटील यांनी पुणे येथील रेस्क्यू चॅरीटेबल ट्रस्टच्या रेस्कू पथकाला पाचारण केले. त्यानंतर २७ ऑक्टोंबरला रात्री २:३० वाजता हे रेस्कू पथक परिसरात दाखल झाले. त्यांनी वनविभागाच्या सहकार्याने हेंद्रुण,मोघण,बोरकुंड परिसरात सापळा रचला आणि नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्याचे मिशन सुरु झाले.

आमदार कुणाल पाटील रात्री १२ पर्यंत जंगलातच

हेंद्रुण, मोघण,बोरकुंड परिसरातील ग्रामस्थांना आधार मिळावा आणि रेस्क्यू पथक, वनविभागाच्या कर्मचार्‍यांचे मनोबल उंचावे व त्यांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून आ.कुणाल पाटील हे २६ ऑक्टोंबरला दुपारी १२ पासून हेंद्रुण-मोघण शिवारात होते. दरम्यानच्या वेळेत आ.पाटील यांनी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकांची जिल्हा रुग्णालयात भेट घेवून नातेवाईकांची विचारपूस केली. त्याच दिवशी रात्री ८:३० वा. बिबट्या बेशुध्द केल्याचा निरोप मिळताच आ.कुणाल पाटील हे हेंद्रूण मोघण गावात दाखल झाले. मात्र दुर्दैवाने रेस्क्यू पथकाला बिबट्याने हुलकावणी दिली.या दिवशी आ.पाटील हे रात्री १२ वाजेपर्यंत ग्रामस्थांसोबतच हेंद्रूण-मोघण परिसरात तळ ठोकून होते.

अखेर बिबट्या जेरबंद

गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरु असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनला आज सोमवारी (दि.30) यश आले. रेस्क्यू पथक आणि वनविभागाने हेंद्रुण शिवारात रचलेल्या सापळ्यात बिबट्या सापडला आणि त्यास बंदूकीतून भूलचे इजेक्शन देवून बेशूध्द करण्यात आले. त्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आले. पुणे येथील रेस्क्यू पथकात नेहा पंचमिया यांच्या मार्गदर्शनाखाली तूहीन साताकर, अभिजित महाले, डॉ.चेतन वंजारी, किरण रहालकर, एकनाथ मंडल, अमित तोडकर, आयुष पाटील यांचा समावेश होता. तर वनविभागातील मुख्यवन संरक्षक ऋषीकेश रंजन, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, वनअधिकारी आर.आर.सदगिर, विनायक खैरनार, भूषण वाघ, आशुतोष बच्छाव, मंगेश कांबळे, डि.आ.अडकिणे, साविता सोनवणे, वनपाल गणेश गवळी यांची महत्वाची भूमिका होती.

हेही वाचा :

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *