नगर : महातंत्र वृत्तसेवा : चासनळी येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने एका आदिवासी महिलेची उपकेंद्रात प्रसूती करावी लागली. त्यात अतिरक्तस्राव झाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी ‘महातंत्र’ने लक्ष वेधताच मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात चासनळी केंद्रातील एका वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल खोत यांना निलंबित केले असून, अन्य एकाला नोटीस बजावण्यात आली आहे. रुग्णवाहिका चालक संजय शिंदे याला कामावरून दूर करण्याची कारवाई केल्याचे समजले. कोपरगाव तालुक्यातील चासनळी आरोग्य केंद्रात साहिल खोत व साक्षी शेटी या दोन डॉक्टरांची नियुक्ती आहे.
आदिवासी महिला रेणुका गांगुर्डे यांना प्रसूतीसाठी दवाखान्यात आणले असता तेथे दोन्ही डॉक्टर गैरहजर होते. तेथील रुग्णवाहिका चालकानेही संबंधित महिलेसाठी रुग्णवाहिका देण्यास डिझेलचे कारण देऊन विलंब केला. त्यानंतर काही वेळानेे संबंधित महिलेला ग्रामीण रुग्णालयाकडे नेण्यात आले. मात्र मध्येच धामोरीच्या उपकेंद्रावर प्रसूती करण्यात आली. तेथे रक्तस्राव अधिक झाल्याने महिलेला अत्यवस्थ अवस्थेतच पुन्हा चासनळीच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथेही परिस्थिती हाताबाहेर गेल्याने महिलेला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र रक्तस्राव अधिक झाल्याने उपचारापूर्वीच त्या महिलेने अखेरचा श्वास घेतला. तब्बल सहा तास हलगर्जीपणामुळेच त्या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. हे प्रकरण दडपण्याचा प्रकार सुरू होता. मात्र दै. महातंत्रने या प्रकरणी आवाज उठविल्यानंतर दखल घेण्यात आली.
चासनळी प्रकरणाची सीईओंनी गंभीर दखल घेतली आहे. यात एका डॉक्टरवर निलंबनाची कारवाई केली असून, अन्य एका डॉक्टरला नोटीस बजावली आहे. तसेच रुग्णवाहिका चालकाला सेवामुक्त केले आहे.
-डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.
हेही वाचा :