छत्रपती संभाजीनगर, महातंत्र वृत्तसेवा : आम्ही पोलिस आहोत. दोन दिवसांपासून शहरात वातावरण खराब आहे. तुमच्या गळ्यातील सोन्याची चेन, बोटातील अंगठ्या काढून माझ्याकडे द्या. तुमच्या गाडीच्या डिकीत ठेवू, अशी बतावणी करून दोन तोतयांनी 79 वर्षीय वृद्ध व्यापाऱ्याला भरदिवसा लुटले. त्यांच्याकडी तीन अंगठ्या आणि सोन्याची चेन, असे साडेसहा तोळ्यांचे दागिने लंपास केले. ही घटना 5 सप्टेंबरला सकाळी ११ वाजता नगरखाला गल्ली भागातील तनवानी प्री-प्रायमरी स्कूलजवळ घडली. या प्रकरणी सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.
प्रेमचंद मिश्रीलाल ओस्तवाल (79, रा. जे. जे. कॉम्पलेक्स पहिला मजला, सुपारी हनुमान मंदिर रोड) हे फिर्यादी आहेत. ते किराणा व्यापारी आहेत. ते पत्नीसह नियमित कुंभारवाडा येथील महावीर भवन येथे दर्शनासाठी जातात. ५ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता ते दोघे दर्शनासाठी गेले. तेथून घरी परतत असताना भाजीपाला खरेदीसाठी त्यांनी पत्नीला सुपारी हनुमान मंदिर रोड येथे साेडले. त्यानंतर ते नाश्ता करण्यासाठी औरंगपुऱ्याकडे निघाले. नगरखाना गल्लीतून जात असताना ते तनवानी प्री- प्रायमरी स्कूलजवळ येताच एका तोतयाने त्यांना गाठले. त्याने पोलिस असल्याची बतावणी करून दोन दिवसांपासून वातावरण खराब आहे. तुमच्याकडील सोने माझ्याकडे द्या. तुमच्या गाडीच्या डिकीत ठेवतो, असे बोलला. त्याचवेळी त्याचा साथीदार तेथे आला. त्यानेही त्याचीच रि पुढे ओढून दागिने डिकीत ठेवण्यासाठी देण्यास भाग पाडले.
अन् दगड असलेली पुडी ठेवली डिकीत
प्रेमचंद ओस्तवाल यांनी तीन अंगठ्या आणि चार तोळ्यांची चेन तोतयांच्या हातात दिल्यावर त्यांनी एका कागदात पुडी बांधली. तीच पुडी ओस्तवाल यांच्या गाडीच्या डिकीत ठेवत असल्याचे भासविले आणि स्वत:कडी छोटे-छोटे दगड असलेली पुडी डिकीत ठेवली आणि दोन्ही तोतये तेथून निघून गेले. काही वेळाने ओस्तवाल यांनी पुडी उघडून पाहिल्यावर त्यात दगड असल्याचे आढळले. त्यानंतर ओस्तवाल यांनी कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला. त्यांनी सिटी चौक ठाणे गाठून गुन्हा नोंदविला. अधिक तपास उपनिरीक्षक प्रशांत मुंडे करीत आहेत.