यवतमाळ : पोहण्याचा मोह जिवावर बेतला; पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू | महातंत्र
यवतमाळ : महातंत्र वृत्तसेवा, वणी (जि.यवतमाळ) जवळील वांजरी गावालगतच्या खाणीत बुडालेल्या तिघांच्याही मृतदेहाचा शोध घेण्यात रविवारी (दि.३) सकाळी वणी पोलिसांना यश आले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी वणीच्या ग्रामीण रूग्णालयात रवाना करण्यात आले. आसिम अब्दुल सत्तार शेख (१६), नुमान शेख सादिक शेख (१६) दोघेही रा. एकता नगर व प्रतीक संजय मडावी (१६) रा. प्रगतीनगर अशी मृतांची नावे आहेत.

तिघे घनिष्ठ मित्र

माहितीनुसार, आसिम, नुमान व प्रतीक हे वणीतील एका महाविद्यालयात ११ वीत शिक्षण घेत होते. हे तिघेही चांगले मित्र होते. शनिवारी (दि.२) ते त्यांच्या मोपेडने शहरापासून जवळच असलेल्या वांजरी परिसरात गेले होते. तेथे तळे बघून या तिघांनाही यात पोहण्याची इच्छा झाली. ते पाण्यात पोहायला गेले. मात्र त्यानंतर ते बाहेर आलेच नाही. संध्याकाळ होत आली तरी मुले घरी परतली नाही म्हणून त्यांचे पालक चिंतेत होते. त्यांनी त्यांच्या मित्रांना विचारपूस केली असता, हे तिघे मित्र लाँग ड्राईव्हला गेल्याचे त्यांना कळले.

यवतमाळ : पोहण्याचा मोह जिवावर बेतला

मुलांजवळ असलेला मोबाईल सुरू होता. मुलांचे पालक त्या मोबाईलवर सातत्याने कॉल करीत होते. मात्र मोबाईलवर केवळ रिंगच जात होती. वांजरी येथील स्वप्निल रहाटे यांची  शेती वांजरी शेतशिवारात आहे. ते संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास शेतातून बैल घेऊन घरी जात होते. दरम्यान त्यांना या खड्ड्याजवळ मुलांची मोपेड उभी असलेली आढळली. त्यामुळे ते त्या तळ्याजवळ गेले. तिथे त्यांना डिक्कीतून मोबाईलची रिंग वाजत असल्याचे आढळले. बाजूला कपडे असल्याने त्यांना संशय आला व मात्र डिक्की लॉक असल्याने ते तातडीने वांजरी येथे परतले. स्वप्निल यांनी गावातील काही लोकांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. दरम्यान मुलांचे पालक सातत्याने कॉल करीत असल्याने मुलांच्या मोबाईलची रिंग वाजत होती. एकाने कपडे तपासले असता त्यांना त्यात दुचाकीची चाबी आढळली. त्या चाबीने त्यांनी डिक्की उघडली व मोबाईल रिसिव्ह केला. गावक-यांनी त्यांना घटनास्थळ सांगून मुले घटनास्थळी नसल्याची माहिती दिली.

मुलांच्या पालकांनी तातडीने वणी पोलिसांना संपर्क साधत मुले बेपत्ता असल्याची माहिती दिली व ते घटनास्थळी रवाना झाले. सायंकाळी ७ वाजता जलतरणपटूंच्या मदतीने शोध घेण्यात आला. मात्र मृतदेह सापडले नाही. रविवारी दिवसभर पुन्हा शोधमोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत तिघांचेही मृतदेह हाती लागले. घटनास्थळी वणीचे ठाणेदार अजित जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक माया चाटसे, सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कांबळे व पोलीस कर्मचारी तळ ठोकून होते.

हेही वाचा 

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *