जालना39 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
देशातील विरोधकांच्या आघाडीने त्यांच्या आघाडीच्या नावाचा शॉर्टफॉर्म I.N.D.I.A. असा केल्यानंतर या नावावरून चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरू आहे. त्यात आता आगामी G20 परिषदेसाठी देशांना पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असे लिहिण्यात आले आहे. यावरुन आरोप प्रत्यारोप सुरू आहे. यावरुन काँग्रेसने भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. तर छत्रपती संभाजीराजे यांनी मात्र, या निर्णयाचे स्वागत केले आहे. इंडिया शब्द बदलून भारत करणार असेल, तर काही चुकीचे नाही, असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
G-20 ची बैठक 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान दिल्लीतील प्रगती मैदानावर होणार आहे. या बैठकीच्या डिनरला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती भवनातून निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या आहेत. सरकारने निमंत्रण पत्रिकेत देशाचे नाव बदलल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. सरकारने निमंत्रण पत्रिकेत INDIA ऐवजी BHARAT लिहिल्याचा आरोप जयराम यांनी केला आहे.
मराठा आंदोलनावर मांडले मत
जालना येथे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलना देखील छत्रपती संभाजीराजे यांनी भेट दिली. या संदर्भात मनोज जरांगे यांच्याशी त्यांनी संवाद साधला. तसेच मराठा समाजाच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या वेळी ते म्हणाले की, मराठा समाजाची जी भूमिका असेल ती माझी असेल, सरकारच्या समितीला मी काही मुद्दे सुचवले होते, असे देखील संभाजीराजे यांनी सांगितले.
क्युरेटीव्ह पिटीशन अगोदरच टाकायला हवे होते
या संदर्भात छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, तुम्हाला आरक्षण मिळावायचे असेल, तर वेगवेगळे पॅरामीटर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला मागास म्हटलेले नाही. पहिल्यांदा मराठा समाजाला आयोगाने मागास ठरवायला हवे. दुर्गम आणि दुर्बल भागातील लोकांना 50 टक्क्याच्यावर आरक्षण देता येते. अन्यथा केंद्राला बदल करावा लागेल. क्युरेटीव्ह पिटीशन अगोदरच टाकायला हवे होते. हा राज्याचा प्रश्न आहे. निजामाने मराठ्यांना कुणबी केले होते. मराठवाड्यातल्या कुणब्यांना आरक्षण द्यावे, असे देखील संभाजीराजे म्हणाले.