गर्भश्रीमंत घराण्यातून आले ‘होते’ हे क्रिकेटपटू | महातंत्र

आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड समजले जाते. आयसीसी कर्मचार्‍यांचे पगारही आपल्या खात्यातून भागवणारे बीसीसीआय क्रिकेटमधील महासत्ताच आहे. मग या मंडळाचे खेळाडूही मालामाल असणार यात शंकाच नाही. बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना आता इतके धनाढ्य बनवले आहे की, परदेशी खेळाडूंनाही त्यांचा हेवा वाटतो. बीसीसीआयने भारतात क्रिकेटचा इतका विकास केला आहे की, खेडोपाड्यातील मुलेही भारतीय संघात पोहोचू शकतात, पण पूर्वीच्या काळी अशी परिस्थिती नव्हती. पूर्वीचे खेळाडू क्रिकेट करिअर बरोबरच बँकेत, सरकारी खात्यात किंवा खासगी कंपनीत नोकरीही करायचे. स्वातंत्र्यपूर्व काळात तर क्रिकेटला श्रीमंतांचा खेळ समजले जायचे. त्यावेळी भारतात असणारे इंग्रज क्रिकेट खेळायचे आणि त्यांच्या सोबतीला जे इंग्रजांसाठी काम करायचे ते क्रिकेट खेळायला शिकले. याशिवाय इंग्रजांशी सख्य असलेले काही संस्थानिक क्रिकेट खेळत असत. यातील काही संस्थानिकांची पुढची पिढी देशासाठी खेळू लागली. त्यांच्या वाडवडिलांनी त्यांच्यासाठी अमाप संपत्ती सोडली होती. आपण आज अशा क्रिकेटपटूंची माहिती घेऊ जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले; परंतु पुढे त्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून जगात नाव कमावले.

विजय मर्चंट

विजय मर्चंट यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1911 रोजी मुंबईत अतिशय वैभव संपन्न परिवारात झाला. उजव्या हाताने फलंदाजी आणि पार्टटाईम मध्यमगती गोलंदाज म्हणून त्यांनी भारतीय क्रिकेटची सेवा केली. क्रिकेटशिवाय ते हिंदुस्थान स्पिनिंग अँड विविंग मिल्स (ठाकरे ग्रुप) याच्याशीही ते जोडले गेले होते.

नवाब मन्सूर अली खान पतौडी

महान भारतीय कर्णधार नवाब मन्सूर अली खान पतौडी यांनी एक गर्भश्रीमंत खेळाडूचा टॅग घेऊन भारतीय संघात प्रवेश केला. ते टायगर पतौडी नावाने प्रसिद्ध होते. हरियाणामधील गुरगाव जवळच्या पतौडी येथील नवाब होते. 1952 ते 1971 या काळात त्यांच्याकडे पतौडीचे नवाबपद होते. त्यांच्याकडे हजारो एकर शेती आणि करोडोेंची संपत्ती होती. केवळ 21 व्या वर्षी ते भारतीय संघाचे कर्णधार बनले. त्यांनी भारतासाठी 46 सामन्यांत 2793 धावा केल्या तर 300 प्रथमश्रेणी सामन्यात 15 हजारहून अधिक धावा केल्या.

अजय जडेजा

भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा हे सुद्धा राजेशाही परिवारातून येतात. 1 फेब्रुवारी 1971 मध्ये गुजरातच्या शाही कुटुंबात जन्मलेल्या अजय यांचे पूर्ण नाव अजयसिंहजी दौलतसिंहजी जडेजा असे आहे. ते जामनगरचे संस्थानिकाचे वारसदार आहेत. जामनगर हे पूर्वी नवानगर नावाने ओळखले जात होते. कच्छच्या खाडीच्या दक्षिण तिरावर स्वातंत्र्यपूर्व काळात जडेजा घराण्याची रियासत होती. या घराण्यात क्रिकेटचे मूळ खूप लवकर रुजले. अजय जडेजा यांचे पूर्वज सर रणजितसिंहजी विभाजी जडेजा हे खूप चांगले क्रिकेट खेळायचे. ते 1907 ते 1933 या काळात जामनगरचे राजा होते. भारतातील प्रमुख क्रिकेट स्पर्धा रणजी स्पर्धेचे नाव सर रणजितसिंहजी यांच्या नावावरूनच ठेवण्यात आले आहे. हाच वारसा अजय जडेजा यांनी देशासाठी खेळून गाजवला.

सौरभ गांगुली

सौरभ गांगुली हे भारताच्या आधुनिक क्रिकेटमधील एक यशस्वी कर्णधार. गांगुली हे कोलकाताच्या एका समृद्ध परिवारातून आले. सौरवचे आजोबा आणि वडील हे तेथील प्रतिथयश व्यावसायिक होते. ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ म्हणून ओळखला जाणारे सौरभ गांगुली क्रिकेट जगतात प्रवेश करण्यापूर्वी आपल्या शंभर दालनाच्या आलिशान घरात राजकुमारासारखे राहात होते. सौरव यांच्याविषयी एक किस्सा सांगितला जातो, तो म्हणजे गांगुली हे संघात नवीनच दाखल झाले असता, त्यांना मैदानातील फलंदाजांना पाणी देण्यास सांगण्यात आले; परंतु त्यांनी याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. मला पाणी देण्यास माझ्याकडे दहा नोकर आहेत, मी असले काम करणार नाही, असे गांगुली यांनी सांगितले. अर्थात, या किस्स्यातील सत्यतेची पुष्ठी कोणीही करीत नाही.

गौतम गंभीर

दिल्लीतील एक यशस्वी व्यावसायिकाच्या घरी 14 ऑक्टोबर 1981 मध्ये जन्मलेल्या गौतम गंभीरच्या लहापणापासूनच सार्‍या सुखसोयी दिमतीला हजर होत्या. देशातील सर्वात पॉश परिसरात त्यांचे घर आहे. अनेक टेक्स्टाईल फॅक्टरीचे मालक असलेल्या दीपक गंभीर यांनी गौतम यांच्या क्रिकेट खेळाला चांगलेच प्रोत्साहन दिले. लाडाकोडात वाढलेल्या गौतम यांनी क्रिकेटसाठी उन्हात, पावसात धुळीत घाम गाळला. त्यामुळे त्यांनी यशस्वी उद्योजकऐवजी यशस्वी क्रिकेटपटू म्हणून गौरव मिळवला. भारताला दोन विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणार्‍या गौतम यांनी लोकसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवली आणि ते खासदार झाले.

 

 

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *