- Marathi News
- Local
- Maharashtra
- The Person Who Made Offensive Posts About Chhatrapati Shivaji Maharaj Was Arrested, This Shocking Information Came Out During The Investigation
सातारा6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आपल्या मैत्रिणीशी चॅटिंग करणाऱ्या मुलाला अद्दल घडावी, या उद्देशाने त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करून त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याची कबुली अटक केलेल्या आरोपीने चौकशीत दिली असल्याची माहिती सातारा जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी 15 ऑगस्ट रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ज्या विधीसंघर्ष मुलाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ती पोस्ट व्हायरल झाली होती, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र त्यानंतरही त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट कोणीतरी ऑपरेट करत असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाच्या सखोल चौकशीच्या मागणीने जोर धरला होता.
या सखोल तपासातूनच ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या विधीसंघर्ष मुलाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याच्या नकळत आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या आरोपीला सातारा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करून जेरबंद केले आहे. आपणच हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिली असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी दिली आहे.
हा संशयित आरोपी त्याच्या मैत्रिणीसोबत इन्स्टाग्रामवर चॅटिंग करायचा. त्याचवेळी ती मैत्रीण आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी आधी ताब्यात घेतल्या गेलेल्या अल्पवयीन मुलाशीही चॅटिंग करायची. ते संशयित आरोपीला आवडत नव्हते. त्याच रागातून त्या दोघांचे कनेक्शन तुटावे, त्याचबरोबर त्या मुलाची बदनामी होऊन त्याला अद्दल घडावी, यासाठी हा प्रकार केल्याचे त्याने चौकशीत पोलिसांना सांगितले आहे.
सुरुवातीला संशयित आरोपीने ‘आरोही’ अशा स्त्रीदर्शक नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार केले. त्यावरून त्या अल्पवयीन मुलाशी त्याने चॅटिंग सुरू केले. यातून हळूहळू त्या मुलाचा विश्वास संपादन करत एक दिवस त्याने हळूच मुलाकडून त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा आयडी व पासवर्ड मिळवला. इथेच हा मुलगा फसला व त्याच्या अकाउंटची सूत्रे संशयित आरोपीकडे गेली. मग त्याने या मुलाला अडचणीत आणण्यासाठी त्याच्या अकाउंटवरून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली, असा घटनाक्रम चौकशीत समोर आला आहे.