नगर : महातंत्र वृत्तसेवा : जिल्ह्यातील जनता गेल्या 12 वर्षांत पाच वेळा दुष्काळी परिस्थितीत होरपळली आहे. आतापर्यंतच्या दुष्काळात 2019चा दुष्काळ अधिक तीव्र होता. तब्बल 14 लाख 56 हजार लोकसंख्येसाठी 873 टँकर धावले होते. मात्र यंदा पावसाने अधिकच गुंगारा दिला. त्यामुळे साडेतीन महिन्यांत फक्त 225 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे यंदाचा दुष्काळ अधिक तीव्र असण्याची भीती आहे. दोन-तीन वर्षे समाधानकारक पाऊस झाला की आगामी पावसाळा हमखास गुंगारा देतो. सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली, की टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढीस लागते. जनतेची तहान भागविण्यासाठी टँकर सुरू करावेच लागतात. खरीप आणि रब्बी हंगामातील पिकेदेखील हाती लागत नाहीत. त्यामुळे मोकळ्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी लागतात. पिके हातची गेल्यास शासनाच्या अनुदानाची शेतकर्यांना वाट पाहावी लागते.
संबंधित बातम्या :
2011 मध्ये जिल्ह्यात कमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे जून 2012 पर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. 2014 व 2015 या दोन्ही वर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे सलग दोन वर्षे दुष्काळी उपाययोजना सुरू कराव्या लागल्या होत्या. 2018 मध्ये सरासरी 345 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे जानेवारी 2019 पासूनच जिल्हाभरात टंचाईच्या झळा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे दिवसेंदिवस टंचाई परिस्थिती अधिक तीव्र होऊन जूनअखेरपर्यंत 603 गावे आणि 3 हजार 400 वाड्यांत पाणीटंचाई निर्माण झाली होती. या टंचाईग्रस्त गावांतील 14 लाख 56 हजार लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी तब्बल 873 टँकर धावत होते. 1 ऑक्टोबर 2018 ते 30 जून 2019 या कालावधीसाठी जवळपास 95 कोटींचा टंचाई आराखडा मंजूर करण्यात आला होता. गेल्या वीस वर्षांत याच वर्षी सर्वाधिक टँकर धावले होते.
2023 या वर्षी सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिली. 1 जून ते 13 सप्टेंबर या साडेतीन महिन्यांत फक्त 225 मिलीमीटर पाऊस झाला. मात्र, दमदार पावसाअभावी भूजलपातळी वाढली नाही. अद्याप पावसाचा एक महिना बाकी आहे. या कालावधीत शंभर मिलीमीटर पाऊस झाला, तरी 325 मिलीमीटरची तूट असणार आहे. त्यामुळे यंदा खरिपाबरोबरच रब्बी पिकेदेखील हाती लागणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे.
2019 मधील तालुकानिहाय टँकरसंख्या
संगमनेर : 76, अकोले 16, कोपरगाव : 11, श्रीरामपूर : 00, राहुरी 4, नेवासा : 63, राहाता : 8, नगर : 70, पारनेर : 120, पाथर्डी : 146, शेवगाव : 65, कर्जत : 85, जामखेड : 59, श्रीगोंदा : 79, पारनेर शहर : 16, जामखेड शहर : 38, पाथर्डी शहर : 6, कर्जत शहर : 8, शेवगाव शहर : 3.