मुंबई; महातंत्र वृत्तसेवा : महाराष्ट्राने ठाकरेंच्या सहा-सात पिढ्या पाहिल्या आहेत. अख्खा भाजप समोर उभा टाकला तरी ते ठाकरेंना संपवू शकणार नाहीत, असा इशारा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी भाजपला दिला.
भाजपकडे सैन्यच नाही त्यामुळे ते इतर पक्ष फोडत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता ते काँग्रेस पक्ष फोडतील अशी चर्चा आहे. स्वतःचे सैन्य नसल्यामुळे इतरांना फोडून आयारामांचे मंदिर उभारण्याचा उद्योग सुरू आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी केली. वांद्रे येथील रंगशारदा सभागृगात ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्यांचा मेळावा पार पडला. यावेळी ठाकरे यांच्यासह सुभाष देसाई, संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे तसेच इतर नेते उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी भाजपवर फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप करत जोरदार टीका केली. भाजपने कर्नाटकात ‘जय बजरंगबली’चा नारा दिला. पण बजरंगबलीने त्यांच्याच डोक्यात गदा हाणली. आता, महाराष्ट्रात औरंगजेब समोर आणला जात आहे. भाजप प्रत्येक राज्यात आयारामांचे मंदिर उभारत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray)
स्वराज्यावर अफझल खानाची स्वारी झाली तेव्हा आमच्यात सामील व्हा, अन्यथा राखरांगोळी करू, असे फर्मान अफझल खानाने स्वराज्यातील सरदारांना पाठविले. सध्या ईडी, सीबीआय यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या मार्फत असेच फर्मान पाठविले जात आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
संभाजी ब्रिगेड आता शिवसेनेसोबत आली आहे. त्यांच्याशी शिवसेनेची युती झाली आहे. पक्षात आणि महायुतीत आलेल्यांची नोंद ठेवण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावे लागत आहे. मस्टर मंत्र्यासारखी त्यांची अवस्था झाली आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मित्र म्हणून मिठी मारली तर तुम्ही पाठीत वार केलात. त्यामुळे कोथळा काढावाच लागणार, असा हल्लाबोलही ठाकरेंनी केला. (Uddhav Thackeray)
हेही वाचा :