नारळी पौर्णिमा आणि समुद्राचं काय नातं? समजून घ्या या सणाचा अर्थ आणि त्यामागचं खरं कारण

Narali Purnima 2023: श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरे केले जाते. त्या व्यतिरिक्त नारळी पौर्णिमेला कोळी बांधव व समुद्रकिनारी राहणारे लोक समुद्राची पूजा करुन मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात. काही ठिकाणी सोन्याचा नारळही समुद्र वाहतात. समुद्राला नारळ अर्पण करण्याचे महत्त्व काय आणि नारळीपौर्णिमेलाच ही प्रथा का करतात? याचे कारण जाणून घेऊया. 

नारळी पौर्णिमा ही महाराष्ट्रात आणि खासकरुन कोकणाकडील भागात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कोळी बांधवाचा नारळी पौर्णिमा हा महत्त्वाचा सण आहे. नारळी पौर्णिमेनंतर  गेल्या दीड- दोन महिन्यांपासून बंद असलेल्या मच्छिमारी व्यवसाय आणि जल व्यापार पुन्हा सुरू केली जाते. म्हणूनच या सणाचा कोळी बांधवांमध्ये या सणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी

निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोळीबांधव हा सण साजरा करतात. याचे कारण म्हणजे पावसाळ्याचे दिवस वगळता संपूर्ण वर्षभर कोळी बांधव समुद्रात बोटीवर असतो. भर समुद्रात मासेमारी करायला निघालेल्या आपल्या धन्याच्या सुरक्षिततेसाठी कोळी महिला समुद्रदेवाची पूजा करतात. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित राहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव समुद्रात नारळ सोडतात. 

धन्याचे रक्षण कर रे… 

कोळी बांधव समुद्राला सोन्याचा नारळ म्हणजेच नारळाला सोन्याचे वेष्टन किंवा पत्रा गुंडाळून छान सजवून विधिवत समुद्राला अर्पण केला जातो. नारळ हे सर्जनशक्तीचे प्रतीकही मानले जाते. तसंच, या दिवसासाठी नारळाच्या करंजीचा नैवेद्य बोटीला व समुद्राला दाखवतात. खोल समुद्रात जाणार्या आमच्या कुंकवाचे रक्षण कर, आमच्या बोटीवर मुबलक मासोळी मिळू देत, असे गाऱ्हाणे कोळी महिला समुद्राला घालतात. 

अशी साजरी केली जाते नारळीपौर्णिमा 

नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी वाड्यात मोठा उत्साह असतो. यादिवशी कोळी महिला नटून थटून समुद्रावर जातात. बोटी, होड्या यांना रंगरगोटी करुन पताका लावून छान सजवले जाते. नंतर ही होडी समुद्रात सोडली जाते. कोळीवाड्यातून मोठ्या मिरवणूका निघतात. लहान मुलांसह सगळेच वाजत गाजत व पारंपारिक कोळीगीते गात बंदरावर येतात. त्यानंतर खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी  सोन्याचा नारळ अर्पण केला जातो.

दरम्यान, नारळीपौर्णिमेच्या दिवशी घराघरांत नारळाचा गोड पदार्थ बनवला जातो. नारळाची वडी, नारळाची बर्फी किंवा नारळाचा भात बनवण्याची प्रथा असते. 



Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *