आरोग्य विभागाला रिक्त पदांचे ग्रहण ; स्पेशालिस्ट डॉक्टरांची जवळपास 61 टक्के पदे रिक्त | महातंत्र

पुणे : महातंत्र वृत्तसेवा :  आरोग्य विभागाला गेल्या काही दिवसांपासून रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. एकीकडे प्रशासकीय निर्णयांसाठी अत्यावश्यक मानली जाणारे पुणे आणि मुंबई येथील दोन्ही आरोग्य संचालकांची पदे रिक्त आहेत. तर, दुसरीकडे शासकीय रुग्णालयांमधील स्पेशालिस्ट डॉक्टरांची जवळपास 61 टक्के पदे रिक्त आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालयांमध्ये स्पेशालिस्ट आणि सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात वानवा आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना नाइलाजाने खासगी रुग्णालयांचे दरवाजे ठोठवावे लागत आहे. रिक्त जागांच्या प्रश्नाकडे आरोग्यमंत्री कधी लक्ष देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आरोग्य खात्यात जवळपास 25 टक्के पदे रिक्त आहेत. याअंतर्गत गट अ मधील जास्त पदांचा समावेश आहे. त्यामुळे सध्याच्या
अधिका-यांना एकाहून जास्त विभागांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. रिक्त वरिष्ठ पदांसाठी पात्र असलेल्या सध्याच्या अधिका-यांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे सध्याच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना कौशल्यानुसार पदोन्नती केली जाणार आहे. त्यासाठी पदोन्नतीच्या निकषांमध्ये बदल केले जाणार आहेत, अशी माहिती जून महिन्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली होती. मात्र, अद्याप त्याबाबत 100 टक्के अंमलबजावणी झालेली नाही.

सध्या राज्यात विविध साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य संचालकांपासून डॉक्टरांपर्यंत अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे औषध खरेदीसारख्या प्रशासकीय निर्णयांपासून प्रत्यक्ष रुग्णसेवेपर्यंत सर्वच सेवांवर परिणाम होत आहे.

किती पदे रिक्त ?
आरोग्य विभागातील मोठ्या रुग्णालयांमध्ये क्लास वन च्या स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या तब्बल 61 टक्के जागा रिक्त आहेत. 676 पैकी केवळ 263 जागा भरलेल्या असून, 413 जागा रिक्त आहेत. बालरोगतज्ज्ञांची 61 पैकी 32 भरलेली आहेत. तर स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉक्टरांच्याही 68 जागा असून, त्यापैकी 32 जागा भरलेल्या आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञांच्या 53 टक्के जागा रिक्त आहेत. भुलतज्ज्ञांच्या 82 पैकी 51, नेत्ररोग तज्ज्ञांच्या 44 पैकी 26, अस्थिरोग तज्ज्ञांच्या 34 पैकी 17, कान नाक घसा तज्ज्ञांच्याही 33 पैकी 20 जागा भरलेल्या आहेत. रेडिओलॉजिस्टच्या 59 पैकी 22, मानसोपचार तज्ज्ञांच्या 96 पैकी 28, पॅथॉलॉजिस्टच्या 36 पैकी 25, फुप्फुसविकार तज्ज्ञांच्या 32 पैकी 7, त्वचारोग तज्ज्ञांच्या 31 पैकी अवघ्या दोनच जागा भरलेल्या आहेत.

डॉक्टरांची कमतरता का जाणवतेय ?
शासकीय रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय सेवा यांची कमतरता असल्यामुळे डॉक्टरांना स्वत:च्या प्रगतीच्या दृष्टीने अनुभव गाठीशी मिळत नाही. त्याचप्रमाणे शासकीय आणि खासगी रुग्णालयांमधील वेतनामध्येही खूप तफावत आहे. तसेच, शासकीय रुग्णालयांमध्ये कामाच्या वेळा, बदल्या अशा अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे स्पेशालिस्ट किंवा सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर खासगी रुग्णालयांना जास्त पसंती देतात.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *