छत्रपती संभाजीनगर11 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपुष्टात येणार आहे. आणखी १२० दिवस कुलगुरू म्हणून ते काम करतील. पण नव्या कुलगुरूंच्या शोधसाठी तज्ज्ञ समिती आता गठित करण्यात आली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) विद्यमान अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांची कुलगुरू शोध समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट-२०१६ च्या कलम ११ (३) नुसार कुलगुरूंची निवड तज्ज्ञांच्या निवड समितीद्वारे करण्यात येते. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस निवड समितीची घोषणा करतात. बैस यांनी चौघांची समिती गठित केली आहे. एआयसीटीईचे अध्यक्ष तथा नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरमचे अध्यक्ष डॉ. सहस्त्रबुद्धे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. भोपाळ येथील माखनलाल चतुर्वेदी वृत्तपत्रविद्या व जनसंवाद राष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. जी. सुरेश यांचीही समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.


त्याशिवाय महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट-२०१६ च्या कलम ११ (३) (क) नुसार कुलगुरू शोध समितीवर विद्यापीठाच्या एका प्रतिनिधीची निवड करण्यात येते. त्यानुसार व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेच्या संयुक्त बैठकीत तिसऱ्या सदस्याची यापूर्वीची निवड करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मिरच्या श्रीनगर येथील एनआयटीचे संचालक डॉ. सुधाकर एडला यांचे नाव कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनीच घोषित केले होते. त्यांच्या प्रस्तावाला राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप आणि विद्या परिषद सदस्य डॉ. व्यंकटेश लांब यांनी अनुमोदन दिले होते. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी समितीचे चौथे सदस्य असतील. एनआयटीचेच जानिब-उल-बशीर यांना नोडल ऑफिसर केले आहे.

समितीच्या दोन बैठकाही झाल्यात
डॉ. सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यतेत समितीच्या आत्तापर्यंत दोन बैठकाही झाल्या आहेत. १४ जुलैला झालेल्या बैठकीत जाहिरात प्रसिद्ध करण्यावर चर्चा करण्यात आली होती. जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर पंधरा ते वीस दिवस देशभरातून अर्ज मागवण्यात येतील. त्यानंतर अर्जांची मुंबईत छाननी केली जाईल. छाननीनंतर समिती पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी निमंत्रित करणार आहे. त्यानंतर टॉप फाईव्ह प्राध्यापकांची नावे राजभवनाला पाठवले जाईल. राज्यपाल बैस पाच जणांच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’ अंतर्गत प्रत्यक्ष मुलाखती घेतील अन् एका नावाची घोषणा करतील. या जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहिल असा अंदाज आहे.