विशाळगड: छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा व इतिहासाच्या स्मृती जागवणारा ‘किल्ले विशाळगड’ (ता शाहूवाडी) शनिवारी (दि २८) रात्री आठ वाजता शेकडो ‘मशालीं’च्या प्रकाशाने उजळून निघाला. निमित्त होत ‘मशाल’ महोत्सवाचे. दरम्यान, रात्रीच्या किर्र अंधारात मशालीच्या उजेडाने उजळून निघालेला गड कॅमेऱ्यात टिपण्यासाठी कार्यकर्ते, भाविकांची धडपड सुरू होती. प्रत्येक वर्षी ‘मशाल महोत्सव’ कोजागिरी पोर्णिमेदिवशी साजरा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. (Vishalgarh)
विशाळगडावरील पवित्र इतिहास व शिवकालीन साक्षीदार, स्वराज्याचे अखंड प्रेरणास्रोत आहेत. त्यांचे संवर्धन होण्याची गरज आहे. त्याचा जागर घडावा, या गडाचे गत वैभव उभारले जावे, यासाठी मशाल जागर मोहीम मोलाची भूमिका ठरेल, असा विश्वास बाजीप्रभू देशपांडे यांचे अकरावे वंशज संदेशदादा देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केला. (Vishalgarh)
शिवरायांचा जयघोष आणि हाती मशाली घेऊन शिवप्रेमीनी विशाळगडावर स्वराज्य प्रेरणेचा जागर घडवला. कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून येथील बाजीप्रभू तरूण मंडळ, गजापूर ग्रुप ग्रामपंचायत व विविध शिवप्रेमी संघटनांच्या वतीने गडाच्या पायथ्यावरील खोकलादेवी ते गडावरील वाघजाई मंदिर अशी दीड किलोमीटरची मशाल जागर मोहीम काढली. नरवीर बाजीप्रभूचे अकरावे वंशज संदेश देशपांडे, हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे, बंडू वेल्हाळ, सरपंच चंद्रकांत पाटील, उपसरपंच पूनम जंगम यांनी मोहीमेचे नेतृत्व केले.
रात्री आठ वाजता पायथ्याच्या खोकलादेवी मंदिरातून मशाल जागरणास प्रारंभ झाला. स्वराज्याच्या प्रती सार्थ अभिमानाचा जयघोष व प्रेरणा गीताने धुक्यात हरवलेल्या गडाचा परीसर मशालीच्या प्रकाशात न्हावून निघाला. मोहीमेस हिंदू एकता जिल्हा प्रमुख संजय जाधव, नारायण वेल्हाळ, प्रतिक पाटील, रोहीत देसाई, पै. प्रदिप निकम, योगेश केळकर, नारायण निवळे, दीपक कांबळे, निखील नारकर, संदेश देशपांडे (शिवस्मारक युवा संघर्ष समिती महाराष्ट्र महारुद्र बाजीप्रभू देशपांडे प्रतिष्ठान), प्रतीक पाटील ( आखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद), रोहित देसाई (भद्रकाली ताराराणी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, कोल्हापूर), विकास डोंगळे (टीम शिवगड), बाजीप्रभू तरुण मंडळ गजापूर-पावनखिंड, हनुमान तरुण मंडळ गजापूर, मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठान कोल्हापूर आदींचे सहकार्य लाभले.
शिवछत्रपतींच्या कालखंडात किल्ले विशाळगडाने राजवैभव आणि उज्वल पराक्रम ‘याची देही, याची डोळे’ अनुभवलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे प्रेरणा आणि ऊर्जेचा अखंड स्त्रोत असलेल्या या किल्ल्यावर शिवकाळातील ऐतिहासिक आठवणींना उजाळा मिळावा, यासाठी ‘मशाल महोत्सव’ साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक मोहिमा, खलबते, नियोजन हे गडांवरच होत असे. शिवछत्रपतींचे किल्ले हे महाराष्ट्रासाठी मंदिरासमान आहेत. अशा ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन करणे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच त्याचे महत्त्व युवा पिढीसमोर सादर करणे ही काळाची गरज आहे.
हेही वाचा