‘1996 वर्ल्डकपमध्ये माझ्याच खेळाडूंनी माझी फसवणूक केली होती,’ वसीम अक्रमचा खुलासा; क्रिकेट विश्वात खळबळ

Wasim Akram on World Cup: पाकिस्तानच्या महान खेळाडूंची नावं घेतली जातात, तेव्हा वसीम अक्रम हे नावही प्रामुख्याने घेतलं जातं. वसीम अक्रमला ‘स्विंग ऑफ सुलतान’ म्हणून ओळखलं जायचं. वसीम अक्रमने आपल्या करिअमध्ये इतकी जबरदस्त कामगिरी केली आहे, ज्याच्या जवळ पोहोचणं आजही अनेक गोलंदाजांसाठी फार आव्हानात्मक आहे. यामुळेच वसीम अक्रमचे चाहते फक्त पाकिस्तानपुरते मर्यादित नसून, संपूर्ण जगभरात आहेत. वसीम अक्रमने कसोटीमध्ये 414, वन-डेमध्ये 502 विकेट्स घेतले आहेत. दरम्यान वसीम अक्रमने आपल्या करिअरमधील अशा एका घटनेचा उल्लेख केला आहे, ज्याने त्यांना फार दुखावलं होतं. पाकिस्तानी युट्यूबर डॅनिअल शेखला दिलेल्या मुलाखतीत वसीम अक्रमने त्या घटनेचा उल्लेख केला आहे. 

वसीम अक्रमने उल्लेख केलेली घटना 1996 च्या वर्ल्डकपदरम्यानची आहे. त्याने सांगितलं की, “1996 च्या वर्ल्डकपमध्ये मी पाकिस्तानचा कर्णधार होतो.. पण क्वार्टर फायनलच्या आधी मी अनफिट झालो होतो. मी जखमी झालो होतो. हा सामना भारतात होणार होता. अशा स्थितीत आमीर सोहेलला कर्णधार बनवण्यात आलं”.

“बंगळुरुत झालेल्या या सामन्यात भारताने आमचा पराभव केला होता. पराभव झाल्यानंतर खेळाडूंनी स्वत: जबाबदारी न घेता मला त्यासाठी जबाबदार ठरवण्यास सुरुवात केली. अनेक खेळाडूंनी तर मी पराभवाच्या भीतीपोटी भारताविरोधात खेळण्यास नकार दिला असंही सांगण्यास सुरुवात केली. मी जखमी झाल्याचा बहाणा करत होतो असं ते सांगू लागले,” असं वसीम अक्रमने सांगितलं.

Related News

माजी क्रिकेटरने पुढे सांगितलं की, “ही घटना आजही मला धक्का देणारी आहे. त्यावेळी अनेक चर्चा होऊ लागल्या होत्या. जेव्हा तुमचेच लोक तुमची फसवणूक करतात तेव्हा जास्त दु:ख होतं. पण आता या सगळ्या गोष्टी मी मागे सोडल्या आहेत. हेच आयुष्य आहे. तुम्हाला असंच पुढे सरकावं लागतं. त्यावेळी मी फार त्रासलो होतो. त्यावेळी पीसीबी मला फोन करुन तुम्ही घऱी जाऊ नका, लोक संतापले आहेत असं सांगत होतं. मग मी कुठे जाऊ अशी विचारणा मी त्यांना केली होती”.

“क्रिकेट हे असंच आहे. फक्त एक खेळाडू संपूर्ण सामन्याचं चित्र बदलू शकत नाही. माझ्यावर आरोप करणारे खेळाडू कोण आहेत याची मला माहिती आहे. पण मी त्यांचं नाव घेणार नाही. आता हे सगळं संपलं आहे. पण जेव्हा तुमची अशी फसवणूक होते, तेव्हा मन दुखावतं,” अशी खंत वसीम अक्रमने व्यक्त केली आहे.

1996 च्या क्वार्टर फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा 39 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावत 287 धावा केल्या होत्या. पाकिस्तान संघ फक्त 248 धावा करु शकला होता. या सामन्यात अजय जडेजाने 25 चेंडूंमध्ये 45 धावा करत जबरदस्त खेळी केली होती. अजय जडेजाने वकार युनिसची ज्याप्रकारे धुलाई केली होती, ती चाहते आजही विसरलेले नाहीत. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *