पुणे : टेकडी फोडणार्‍यांवर भरारी पथकाचा ‘वॉच’ | महातंत्र








पुणे : महातंत्र वृत्तसेवा : शहर आणि परिसरातील टेकड्यांचे उत्खनन करणार्‍यांवर आता जिल्हा प्रशासनाने वॉच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. टेकडी फोडणार्‍यांवर तातडीने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
उत्खनन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देशमुख यांनी दिलेले आहेत. याच बरोबर पुणे महानगर प्राधिकरणाच्या वतीनेदेखील संबंधित उत्खनन करणारांना तातडीने नोटिसा काढण्यात येणार असल्याची माहिती पीएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी ‘महातंत्र’ बरोबर बोलताना दिली. अनधिकृतपणे बांधकाम करणारांविरोधातदेखील प्रशासन कडक भूमिका घेत आहे. कोणत्याही क्षणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. दक्षिण पुण्यात असलेल्या डोंगर भागात मोठ्या प्रमाणात डोंगरफोड सुरू असून, त्यामुळे दरड पडण्याची भीती व्यक्त केली जात होती.

प्रामुख्याने टेकडीफोडीचा कात्रज, कोळेवाडी, जांभूळवाडी, भिलारेवाडी, मांगडेवाडी, गुजर निंबाळकरवाडी या परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हाधिकारी, खनिकर्म शाखा यांनी त्याची गंभीर दखल घेत तातडीने अशा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या आदेशानुसार भरारी पथक नेमून पाहणी करण्यात आली आहे. दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याच बरोबर ही पथके सातत्याने या ठिकाणी वॉच ठेवणार असल्याचे संबंधित अधिकार्‍यांनी ‘महातंत्र’शी बोलताना सांगितले.

या भरारी पथकांच्या चौकशीमधून तथ्य आढळून आल्यास, संबंधितांवर जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच कारवाईबाबतचा अहवाल तत्काळ कार्यालयास सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

शहरातील सर्वच टेकड्यांवर ‘वॉच’
शहरातील टेकड्यांवर उत्खनन करणार्‍यांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने टेकडीफोड, अनधिकृत बांधकाम, याविषयी सविस्तर माहिती घेऊन तातडीने त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत. याबाबत पीएमआरडीएने देखील पुढाकार घेतला आहे.

 

 

 









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *