Asia Cup: पाकिस्तानविरुद्ध भारताची लाज राखणाऱ्या पंड्याचं खुलं आव्हान; म्हणाला, ‘आम्ही…’

Hardik Pandya After India Vs Pakistan Asia Cup 2023: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा आशिया चषक स्पर्धेतील सामना पावसात वाहून गेला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात अपेक्षेनुसार झाली नाही. पाकिस्तानी संघाने सुरुवातीपासूनच सामन्यात वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. पाकिस्तानी संघाने पहिल्या षटकापासूनच आपल्या गोलंदाजीने भारतीय फलंदाजांचं आणि चाहत्यांचं टेन्शन वाढवलं. भारताचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबूत परतल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी संयमी खेळी करत भारताला सावरलं. भारताची फलंदाजी संपली तेव्हा सामना कोणीही जिंकू शकतं अशा स्थितीत होता. मात्र दुसऱ्या डावाचा खेळ सुरु होण्याआधीच पाऊस पडू लागला आणि तो थांबलाच नाही. सामना रद्द करुन दोन्ही संघांना 1-1 गुण वाटून देण्यात आल्याने पाकिस्तान सुपर-4 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. या सामन्यात उत्तम फलंदाजी करणाऱ्या हार्दिप पंड्याने भारताच्या आगामी सामन्यासंदर्भात भाष्य केलं आहे. पंड्याने आगामी सामन्यासंदर्भात विरोधी संघाला म्हणजेच नेपाळला इशारा दिला आहे.

…अन् सामना रद्द करावा लागला

खरं तर भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान पाऊस पडेल असं आधीपासूनच सांगितलं जात होतं. मात्र अगदी सामनाच खेळवता येणार नाही एवढा पाऊस झाल्याने चाहत्यांची निराशा झाली. पहिल्या डावामध्ये 2 वेळा पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. मात्र पाऊस थांबल्याने पुन्हा खेळ सुरु झाला आणि भारताच्या फलंदाजीचा संपूर्ण डाव खेळवला गेला. त्यानंतर पाकिस्तानचा संघ फलंदाजीला येण्याआधीच जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि तो थांबलाच नाही. शेवटी सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण वाटून देण्यात आल्याने नेपाळविरोधातील विजयाचे 2 गुण आणि या सामन्यातील 1 गुण मिळाल्याने 3 गुणांसहीत पाकिस्तानने ‘सुपर-4’मध्ये प्रवेश केला.

हार्दिक पंड्या काय म्हणाला?

भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये भारताचा इशान किशन आणि हार्दिक पंड्या खरे हिरो ठरले. दोघांनी अर्धशतकं झळकावताना भारताचा डाव सावरला. या सामन्यानंतर हार्दिक पंड्याने स्पर्धेतील अन्य संघांना खुलं आव्हान दिलं आहे. सोशल मीडियावर पंड्याने फोटो शेअर करताना, आम्ही उत्तमपणे किल्ला लढवला आता सोमवारी संघर्ष सुरु राहील अशा अर्थाची पोस्ट केली आहे. म्हणजेच हार्दिकने नेपाळविरुद्धच्या सामन्यासंदर्भात भाष्य करताना, आम्ही सोमवारच्या सामन्यासाठी तयार आहोत, असं सूचित केलं आहे.

Related News

सलामीवीरांची सुमार कामगिरी

भारतीय संघातील सालामीवीरांची पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील कामगिरी फारच सुमार झाली. विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरसारख्या उत्तम फलंदाजांकडे पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीचं उत्तर नव्हतं हे दिसून आलं. पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांनी भारतीय सलामीवीरांना स्वस्तात तंबूत पाठवलं. मात्र मधल्या फळीतील तरुण फलंदाज इशान किशन आणि हार्दिक पंड्याने भारताचा डाव सावरत त्याला आकार दिला.

पुढचा सामना कधी?

इशान आणि हार्दिक या दोघांच्या संयमी आणि उत्तरार्धातील आक्रमक खेळीमुळे भारताला सामन्यात 266 धावांपर्यंत मजल मारता आली. हार्दिकने 90 चेंडूंमध्ये 87 धावा केल्या तर इशान किशनने 9 चौकार आणि 2 षटकांच्या मदतीने 82 धावांची खेळी केली. भारताचा पुढील सामना उद्या म्हणजेच सोमवारी, 4 सप्टेंबर रोजी नेपाळविरुद्ध होणार आहे.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *