विवाहापूर्वी मानसिक तयारी करणे का आहे गरजेचे? | महातंत्र

अपर्णा देवकर

लग्न म्हणजे मुलींसाठी खूप मोठा बदल असतो. काही वर्षे आपण ज्या घरात आपलं घर म्हणून काढली ते सोडून दुसर्‍याचं घर आपलं म्हणायचं. माहेरचे बंध-पाश तोडून सासरच्या पद्धती, प्रथा, पुन्हा एकदा नव्याने शिकायच्या. आपल्या घरातला सवयीचा दिनक्रम सोडून नव्या घराच्या नव्या दिनक्रमाची सवय लावून घ्यायची. अगदी छोटे-छोटे बारकावे पाहायचे आणि अंगीकारायचे. जुन्या माहेरच्या नात्यांची आपल्या आयुष्यातील भूमिका मर्यादित होणार, हे स्वीकारायचे आणि नव्या नात्यांच्या घडवणुकीकडे लक्ष द्यायचे, यासाठी मनाला ट्रेनिंग देणे हे जास्त महत्त्वाचे ठरते.

लग्नानंतर आयुष्यात कोणते बदल होणार आहेत याची थोडीशी कल्पना मिळवणे, त्यासाठी मानसिक तयारी करणे महत्त्वाचे ठरते. आपल्याला आवडो वा ना आवडो, विवाहाने आपण आपल्या सभोवताली आपोआपच अनेक नाती तयार करत असतो. अगदी लग्न झालेल्या कुटुंबात आपण सून म्हणून जातो, आपल्याला सासू, सासरे मिळतात. त्याव्यतिरिक्त आपण कुणाचे तरी काकी, मामी, वहिनी इत्यादी आपोआपच होऊन जातो. सुरुवातीला आपल्यासाठी ही सारी नाती मजेची, सुखकारक, नव्या कौतुकांची असली, तरी आपल्या जोडीदाराची त्या व्यक्तींशी वर्षानुवर्षाची ओळख असते. त्या व्यक्ती जोडीदाराच्या वागण्या-बोलण्यावर किंबहुना संपूर्ण व्यक्तिमत्त्वावरच आजवर प्रभाव टाकत आल्या आहेत हे विसरून चालत नाही ! त्यामुळे तुमचे नातेसंबंध या जोडीदाराच्या अतिशय जवळच्या वा प्रिय नातेवाईकांशी कसे घडतात त्यावरही तुमची आणि जोडीदाराची एकमेकांना साथसंगत किती प्रिय ठरू शकेल, हे ठरत असते.

तुमच्या संसारावर, पती-पत्नीच्या नात्यावर तुमच्याइतकाच जोडीदाराच्या जवळच्या नातेवाईकांचा काही प्रमाणात का होईना प्रभाव राहणार, हे नजरेआड करून चालणार नाही. घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या नव्या सूनेकडून अपेक्षा असतात. अगदी सूनबाई आल्या की मी गाण्याचा क्लास सुरू करणार आहे पासून ते सूनबाई आल्या की सकाळी दोनदा चहा मागितल्यावर कोणाच्या कपाळावरची आठी पाहायला नको ! ती देईल ! वहिनी आल्या की, ती माझा अभ्यास घेईल किंवा मग आम्ही दोघी सिनेमाला जाऊ शकू इथपर्यंत साध्याच गोष्टी; पण कोणी तरी आपल्याला मोकळा वेळ मिळवून देईल, आपली जबाबदारी, काम वाटून घेईल, आपलं घरचं वेळापत्रक सांभाळण्यासाठी मदत होईल, या अपेक्षा छोट्या-छोट्या दैनंदिन गोष्टींमधून ठेवल्या जातात. प्रत्येकजण आपापल्या द़ृष्टिकोनातून नव्या व्यक्तीकडून अपेक्षापूर्तीची वाट पाहत असते.

अपेक्षांच्या गोंधळात प्रत्यक्ष पतीच्या आपल्या पत्नीकडून काय अपेक्षा आहेत, ते विचारात घेणे राहून जाते. पती-पत्नी दोघेही समजूतदार असले, मोठ्या, नांदत्या कुटुंबात आलेले असले तर त्यातून एकमेकांच्या चुटपुटत्या भेटींची मजा अनुभवतात; परंतु आताच्या पिढीच्या अपेक्षा डायरेक्ट असतात. एकांत मिळावा, स्वातंत्र्य असावे, अशी अपेक्षा असते. भविष्याविषयी विशेषत: नोकरी-व्यवसायातील महत्त्वाकांक्षा, परदेशात वास्तव्याची इच्छा, आर्थिक गुंतवणुकीविषयी काही अपेक्षा या सार्‍यांची सांगड घालावी लागते. नवीन जोडपं एकमेकांशी कसं वागतं, बोलतं याकडेही घरातल्या सगळ्यांचं बारीक लक्ष असतं, अशा वेगवेगळ्या दडपणाखाली आधी पती-पत्नीचंही नातं जमवून येत असतं. एकीकडे नव्याने सुरू होत असलेल्या करिअरमध्ये यशाची शिखरे खुणावत असतात आणि त्याच काळात ही भावनिक, मानसिक जबाबदारी येते.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *