विश्वगुरू असल्याची जाहिरातबाजी कशाला? पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

मुंबई भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधान मोदी हे विश्वगुरू असल्याचे म्हटले जात असताना दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर नसून त्यांच्या काळात अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर कमी झाला असल्याचे म्हटले आहे. जगात भारत हा दरडोई उत्पन्न सगळ्यात कमी असलेल्या देशांपैकी एक असताना विश्वगुरू म्हणून जाहिरातबाजी करण्यात काहीच अर्थ नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. 

एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध राजकीय मुद्यांवर थेट भाष्य केले आहे. चव्हाण यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदींमुळे अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर नाही. भारताच्या लोकसंख्येमुळे पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली. देशातील सगळ्याच घटकांचे मोठे योगदान आहे. यामध्ये कष्टकरी वर्गाचाही मोठा वाटा असल्याचे त्यांनी म्हटले. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वातील युपीए सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेला जी गती होती, ती कायम राहिली असती तर आज भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर असती. पंतप्रधान मोदींनी नोटबंदीपासून अनेक चुकीचे निर्णय घेतले त्याचा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसला असल्याचे चव्हाण यांनी म्हटले. देशाची अर्थव्यवस्था सध्या पाचव्या क्रमांकावर असली तरी दरडोई उत्पन्नात आपला क्रमांक खालच्या पातळीवर आहे. विकसित देश म्हणून असलेल्या निकषात आपण मागे असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे विश्वगुरू म्हणून जाहिरात करण्यात अर्थ नाही. 

Related News

सरकारकडून शिक्षण, आरोग्यावर अतिशय कमी खर्च केला जातो. नागरिकांना सामाजिक सुरक्षा देण्यातही आपण मागे आहोत. संशोधन आणि विकास कार्यक्रमावर (Research and Development) युपीए सरकारच्या काळात अर्थसंकल्पाच्या एक टक्के खर्च केला जात होता. सध्याचे सरकार फक्त 0.6 टक्केच खर्च करत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

इंडिया आघाडी एकजूट राहिल्यास विजय निश्चित

इंडिया आघाडीच्या प्रयत्नाबद्दल ही पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले. भाजपकडे नरेंद्र मोदी, हिंदुत्वाच्या नावावर सध्या 35 टक्के मतदान आहे हे मान्य करावे लागेल. तर, त्यांच्याविरोधात 60 ते 65 टक्के मतदान आहे.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विरोधात, भाजपच्या विरोधात मतदान झाले. मात्र ते विभागले गेले. सध्या लोकसभेत विविध 38 पक्षाचे खासदार आहेत. काँग्रेस स्वबळावर लढली तर 2014, 2019 सारखी स्थिती होऊ शकते…आम्हाला ती स्थिती पुन्हा आणायची नाही असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. भाजपला सत्तेतून बाहेर काढायचे आहे. पुन्हा सत्तेवर आल्यास देशाचे भवितव्य धोक्यात असेल. त्यांना एकपक्षीय हुकूमशाही आणायची असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. 

इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये काही राज्यात जागा वाटपाचा तिढा आहे.. तो चर्चेने सोडवला जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले. काही राज्यांमध्ये इंडिया आघाडीमधील पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत. मात्र, त्या ठिकाणी सामंजस्याने निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप आणि एनडीएला कोणत्याही स्थितीत फायदा होऊ द्यायचा नाही असे ठरलं असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले. 

 

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *