पुणे2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
हॉटेल मध्ये मैत्रिणीसोबत जेवण करण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकाचा मॅनेजर सोबत बिलावरुन वाद झाल्याने त्याला कामगारांनी बेदम मारहाण केल्याची घटना कोंढवा भागात घडली आहे. याप्रकरणी हॉटेलच्या व्यवस्थापकासह कामगाराला अटक करण्यात आली आहे.
याबाबत व्यवस्थापक प्रशांत जामेकर सामल (वय ३८, रा. घुले वस्ती, उंड्री,पुणे), कामगार मौसम कमानसिंग कुंवर (वय २७, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा,पुणे) यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी हॉटेलमधील दोन ते तीन कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हुजेफा मुस्तफा अत्तारवाला (वय ३८, रा. गंगा फ्लाेरन्टिना, एनआयबीएम रस्ता,पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अत्तारवाला व्यावसायिक आहेत. अत्तारवाला आणि त्यांची एक डाॅक्टर मैत्रीण एनआयबीएम रस्त्यावरील स्पाईस फॅक्टरी हाॅटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेले होते. जेवण झाल्यानंतर त्यांना आकारण्यात आलेल्या बिलाबाबत अत्तारवाला यांनी कामगाराकडे विचारणा केली. या कारणावरुन उपाहारगृहातील व्यवस्थापक सामल याने अत्तारवाला यांच्याशी विनाकारण वाद घालून त्यांना शिवीगाळ केली. संपूर्ण बिल भरल्याशिवाय हॉटेल मधून बाहेर पडून देणार नाही, असे सामलने त्यांना सांगितले.
त्यानंतर सामल, कामगार कुंवर आणि साथीदारांनी अत्तारवाला यांच्या डोक्यात काचेची बरणी फोडली. काचेची बरणी डोक्यात मारल्याने अत्तारवाला यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अत्तारवाला यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हॉटेल मधील व्यवस्थापाकासह कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक विजय वगरे पुढील तपास करत आहेत.