बुडापेस्ट, वृत्तसंस्था : जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 (World Athletics Championships 2023) मध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास घडवला. नीरज हा जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे रविवारी झालेल्या स्पर्धेत नीरजने 88.17 मीटर भालाफेक केली. ही कामगिरी सुवर्णपदक जिंकणारी ठरली. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 87.82 मीटर भालाफेक करीत रौप्यपदक मिळवले. चेक (रि) च्या जेकब वडलेच याला कांस्यपदक मिळाले. त्याने 86.67 मीटर भालाफेक केली.
नीरजचा पहिल्या फेरीत फाऊल झाला. दुसर्या फेरीत त्याने 88.17 मीटर अंतर पार केले. ही भालाफेकच त्याला सुवर्णपदकापर्यंत घेऊन गेली.
स्पर्धेच्या पात्रता फेरीत नीरजने 88.77 मीटर भालाफेक केली होती, ही त्याची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ठरली होती, पण अंतिम फेरीत त्याला हे अंतर पार करता आले नाही. नीरज या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार हे नक्की होते; परंतु 90 मीटरचे अंतर पार करायचे हे त्याचे ध्येय होते, यात त्याला अपयश आले. (World Athletics Championships 2023)
नीरजबरोबरच भारताचा किशोर जेना आणि डी. पी. मनू हे दोन भारतीय देखील फायनलमध्ये सहभागी झाले होते; परंतु त्यांना निराश व्हावे लागले. किशोर जेना पाचव्या (84.77 मी.) तर मनूला सहाव्या (84.14 मी.) क्रमांकावर समाधान मानावे लागले. गेल्या वर्ल्ड चॅम्पियशिपमध्ये नीरज चोप्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. अँडरसन पीटर्सने 90.54 मीटर भालाफेक करत सुवर्णपदकावर कब्जा केला होता.
भारताला आतापर्यंत वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकता आलेले नव्हते. यापूर्वी अंजू बॉबी जॉर्जने 2003 मध्ये लांब उडीत कांस्यपदक पटकावले. त्यानंतर 19 वर्षांनी नीरज चोप्राने रौप्यपदक पटकावले, पण सुवर्णपदकाची उणीव यंदा नीरजने भरून काढली.
पारुल चौधरी ऑलिम्पिक पात्रता
3000 मीटर स्टेपलचेस स्पर्धेत अंतिम फेरीत पात्र ठरलेली भारताची पारुल चौधरी ही अकराव्या स्थानावर राहिली असली तरी तिने पॅरीस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली. यावेळी तिने 9 मिनिटे 15.31 सेकंदांची वेळ घेतली.
.@Neeraj_chopra1 brings home a historic gold for India in the javelin throw 👏#WorldAthleticsChamps pic.twitter.com/YfRbwBBh7Z
— World Athletics (@WorldAthletics) August 27, 2023